मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील पक्षांमध्ये नेत्यांचं इनकमिंग वाढलं आहे. नगरपंचायत व नगर परिषदेच्या निवडणुकीवेळी महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी, वेगवेगळ्या पक्षांच्या पदाधिकार्यांनी महायुतीमधील पक्षांमध्ये प्रवेश केला. या काळात महायुतीमधील दोन प्रमुख पक्ष शिवसेना (शिंदे) व भाजपा या दोन्ही पक्षांमध्ये देखील संघर्ष झाला. शिवसेनेच्या (शिंदे) काही पदाधिकार्यांनी भाजपात व भाजपाच्या काही पदाधिकार्यांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी जाहीर नाराजी प्रकट केली होती.
शिवसेना (शिंदे) व भाजपात संघर्ष चालू असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या स्थानिक नेत्यांची तक्रार करण्यासाठी अमित शाहांची भेट घेतल्याची चर्चा रंगू लागली होती. शिंदेंच्या या नाराजीच्या चर्चेवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
या सगळ्या कपोकल्पित गोष्टी : मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मुंबई तकच्या अन्स्टॉपेबल महाराष्ट्र या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी त्यांना एकनाथ शिंदेंच्या कथित नाराजीबाबत प्रश्न विचारला. यावेळी ते म्हणाले, अशा कपोकल्पित गोष्टींवर वेळ घालवत बसलो तर राज्याच्या, जनतेच्या कामांना वेळ कसा मिळेल? मागे एकदा मी आणि एकनाथ शिंदे एकाच हेलिकॉप्टरने पालघरला गेलो. आमच्याकडे वेगवेगळ्या कार असूनही एकाच कारने कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचलो. मात्र, मंचावर आम्ही वेगवेगळे दस्तावेज वाचत असताना प्रसारमाध्यमांनी आमचा फोटो काढला आणि बातमी पसरवली की आम्ही एकाच मंचावर बसूनही एकमेकांशी बोलत नाही. याला काय अर्थ आहे?
मान्य आहे की खालच्या स्तरावर काही गोष्टी होत असतात. काहीच घडत नाही असं काही नाही. त्यांनी आमचे काही लोक घेतले, आम्ही त्यांचे लोक घेतले. त्यातून थोडी नाराजी, राजी झाली. त्यानंतर आम्ही एकत्र बसलो आणि सगळं काही सोडवलं. शेवटी आम्ही दोन वेगवेगळे पक्ष आहोत. त्यामुळे खालच्या स्तरावर होणारे सगळे निर्णय दररोज आमच्याशी चर्चा करून घेतले जात नाहीत. परंतु, त्यातून आमच्यात तणाव निर्माण होत नाही.
मुख्यमंत्री म्हणाले, मी आणि एकनाथ शिंदे परवा एकत्र बसलो आणि ठरवलं की आमच्या पक्षातील सर्वांना सांगायचं की एकमेकांच्या लोकांना, पदाधिकार्यांना आपल्या पक्षात घ्यायचं नाही. तुम्हाला कोणाला पक्षात घ्यायचं असेल तर इतरांचे नेते घ्या. आपसात असं काही करू नका आणि या चर्चेतून सगळं काही संपले.